गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले
जन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले
गळ्यात माझ्या तूच जिवलगा
दिसायला मी काळी सावळी मुलखाची लाजरी
नटणे सजणे या भोळीला ठाऊक नसता परी
तव नयनांचा
तव नयनांचा पाऊस अवचित पडला अंगावरी
वठल्या देही चैत्रपालवी कणकण मोहरले
गळ्यात माझ्या तूच जिवलगा
प्रीतीची तव खातर होऊन तुझ्याकडे धावले
जनरुढीच्या लोहशृंखला झाली जड पाउले
कुचाळकीची
कुचाळकीची आग पसरुनी उठता ही वादळे
हात देउनी तूच राजसा फुलापरी झेलले
गळ्यात माझ्या तूच जिवलगा
पाचूचा हा चुडा भरुनिया तुजभवती नाचले
आनंदाचे अश्रू उधळित सप्तपदी चालले
तूच दयाळा
तूच दयाळा सौभाग्याचे लेणे मज अर्पिले
अभागीनीच्या कुंकू कपाळी सख्या तुवा लाविले
गळ्यात माझ्या तूच जिवलगा मंगलमणी बांधले
जन्मोजन्मीची सुवासीन मी तुझ्यामुळे जाहले